येरे येरे पावसा…

शाळेमध्ये असताना “आवडता ऋतू” वर निबंध लिहायला सांगत. मला नेहमीच हिवाळा आवडायचा. पण त्यावर काही विशेष लिहायला नसायचं.. किंव्हा असं म्हणावं की सुचायचं नाही. मग मन मारून “माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा..” या ठराविक ओळीने सुरुवात करायचो. तसं पावसाळा आणि माझ्यात असं काही विशेष वैर नाही, पण नाही असही नाही.

उन्हाळ्याची सुट्टी मिळाल्यानंतर, क्रिकेट खेळण्याचा ज्वर चढतो. आणि मध्येच पावसामुळे सर्व बंद. घरून तंबी मिळते, बाहेर जायचे नाही, बाहेरचे काही खायचे नाही.. पाऊस म्हणलं की चिख्खल, चिकचिक, सर्दी इत्यादी इत्यादी. आणि सर्वात महत्वाच म्हणजे शाळा आणि पाऊस दोन्ही जवळपास सोबतच हजेरी लावतात. मग कशाला वाटणार पावसाबद्दल प्रेम? वरून पाऊस आला तरी शाळेला सुट्टी नसायची.. गपचूप भिजत शाळेत जायचं. या उलट हिवाळा म्हणजे एकदम सही.. सणासुदीचे दिवस, दिवाळीच्या सुट्ट्या, क्रिकेट, पतंग, काय वाट्टेल ते खेळायचं. एकूण काय तर हिवाळा जाम आवडायचा आणि पावसाळ्याचा नकोसा वाटायचा.

काल पाऊस सुरु झाला. कडक चहा हातात घेऊन खिडकीजवळ उभा होतो, पावसाला बघत. थंड हवेच्या झुळूकेसोबत पाण्याचे थेंब आतमध्ये येत होते, मोठे मोठे टपोरे नाही तर धुक्यासारखे. चिंब भिजवणारे नाही तर ओलावा देणारे. इकडे रेडिओ कोणततरी गाणं गुणगुणत होता. अर्थातच मन भूतकाळात पळणार. पावसाशी जोडलेल्या सगळ्या आठवणींची ट्रेन सुरु झाली. टपरीवर भिजत घेतलेला चहा असेल, प्रचंड भूक लागली असताना गरम गरम घेतलेले भजे असतील, मित्रांसोबत एकामागून एक सटकून पडलेला क्षण असेल,  “कोणाच्या” आठवणी असतील, एखादा गड सर केल्यानंतर दिसणारा विहंगम दृश्य असेल, किती तरी आठवणी दिल्या आहे या पावसाने आपल्याला.

पाऊस संपल्यानंतर सगळं कसं झ्याक वाटतं. धुराने आणि धुळीने माखलेल्या झाडांना पॉवरवॉश मिळतो आणि आपल्याला नवीन रंग दिसू लागतात. मळभ दूर होते.. निसर्गाची आणि मनाची सुद्धा.  समुद्र किनारी रेघोट्या मारल्यानंतर एक लाट येते आणि सर्व काही मिटून जातंना तशी संधी दरवर्षी पाऊस आपल्याला देतो. की बाबारे, ही घे मागच्या वर्षीची क्लीन-चीट, नव्याने सुरु कर आता.

ह्या सगळ्या गोष्टी पावसाने मला दिल्या आणि मी काय दिला पावसाळ्याला; तिरस्कार. म्हणूनच काय ते, पाऊस पण सध्या अधून मधून रागावतो, एक दोन वेळेस भराभरा बोलून नंतर अबोला धरतो. पुण्याला आहे तसा पाऊस पण माझा मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. वाटलं, लहानपणीची केलेली वरवरची स्तुती त्याला समजली असणार.. म्हणूनच गप्प बसला आहे. त्या क्षणी ठरवलं, किमान मनापासून लिहिलेले दोन शब्द तरी पावसाला ऐकवावेत. म्हणून हा छोटासा लेख.

“येरे येरे पावसा…” तुझी खरच खूप आतुरतेने वाट बघत आहे बळीराजा..

Advertisements

जीवाची मुंबई !

मुंबापुरी!

खरं तर मला लहानपनापासुन मुंबईचा द्वेष.

मुंबई… जिकडे लोकांकडे भेटायला…किंवा बोलायला वेळ नाही… त्यात त्यांचा दोष नाही हो…मुंबईकरांचा अर्धा वेळ लोकल मध्ये किंवा बस मध्ये जातो… मग अजुन वेळ तरी कुठुन मिळेल..

मुंबई… जिकडे सगळीकडे गर्दीच गर्दी… मग ती समुद्राजवळची चौपाटी असो…किंवा स्टेशन जवळचा चायवाला…

मुंबईचा कानाकोपरा लोकांनी गजबजलेला…

घरांच तर काही बोलु नका… पु.लं. नी सांगितल्या प्रमाने कबुतराच्या खुराड्यासारखे घर आहेत ईकडे. असो.

पण हा जो काही द्वेष होता ना… तो मुंबईत येईपर्यन्तच!

Spirit of Mumbai जी आहे… ती फक्त ईकडे आल्यानंतरच समजते.

महाराष्ट्रात जर वेळेची खरी किंमत कुठे मिळत असेल, तर ती या मुंबईतच… मिनिटावर चालनारया लोकल… खर तर मला मुंबईमधली जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे लोकल.. जबरदस्त अभियांत्रिकी चा उत्क्रुष्ट नमुना (हुश्श…)… ९.२५ आणि ९.२७ यापैकी कोणती लोकल पकडायची… याचा निर्णय लोक कसा आणि का घेतात ह्याच लॉजिक श्रवणीय असत :p

मुंबईत आल्यानंतर मुंबईकर झालात तर सगळ्या गोष्टिंचा आनंद तुम्हाला घेता येईल… गर्दिची चीड आहे म्हणुन AC taxi मध्ये फिराल पण IInd class मध्ये टाळ आणि म्रुदुंग सोबत किर्तन ऎकण्याची जी मजा आहे.. ती घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मुंबईकर व्हावच लागेल.

मुंबईच्या hang-out जागांना पण तोड नाही… नोव्हेंबर च्या एखाद्या संध्याकाळी मित्रांसोबत वरळी सीफेस वर गप्पा माराव्यात ते पण आरे च्या बाजुवाला sandwich हाणत… आणि मग हाजीअली ला जाऊन हाजीअली ज्युस सेंटर वर cream of lychee खावा… किंवा मग या ३६५ दिवसातला कोणताही दिवस निवडा… आणि मरीन लाईन्सवर जा… कोणी सोबत असो वा नसो पण आपला अरबी समुद्र तुमची साथ नक्की देईल. त्या लाटांकडे बघत असतांना सुर्य कधी मावळेल ते समजणार नाही पण मग लक्ष जाईल ते queens necklace कडे आणि अधुन मधुन येणारया आणि सिग्नल्सशी स्पर्धा करनारया गाड्यांकडे…

दादर कडुन दक्षिणेकडे जायला लागल की जो वेगळा फील येतो तो शब्दात नाही सांगता येणार…

रात्री २ वाजता कार्टर रोड वर भर पावसात चहा मारतांना जी मजा येते त्याची तोड फक्त नरीमग पॉईट वाल्या भेळवाल्या कडे आहे… अजुन कुठेही नाही!

मुंबईतुन बाहेर पडतांना ह्या सगळ्या गोष्टि लक्षात येतात…
I will miss you Mumbai…

खरंच… जीवाची मुंबई!!!